गोपाल लाजूरकर गडचिरोलीकुळातील पूर्वजांच्या स्मृती काव्यात्मक गुंफणीतून शृंगार, करूण रसासह आदरभावाने आळविणे व वाद्यासह जागरण करून कुळदेवतेला प्रसन्न करण्याकरिता ओळखला जाणारा गायन प्रकार म्हणजेच डाहाका. मात्र या गायन प्रकारातील लोककलेचा नाद अलिकडे हरवत आहे.कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याला अंगात आणण्याचा प्रकार काही दशके झाडीपट्टीत सुरू होता. प्रारंभी कुळदेवतेला प्रसन्न करण्याकरिता सदर प्रकार कोळी, ढिवर व अन्य समाजामध्ये सुरू झाला. त्यानंतर त्याचा प्रसार इतर समाजातही झाला. मूळ स्वरूप कुळदेवतेला प्रसन्न करण्याचे असले तरी मागील दशकापूर्वी डाहाका मयत व्यक्तीला अंगात आणण्याकरिता वाजविला जायचा. लग्न समारंभात चार ते पाच दिवसांपूर्वी प्रत्येक लग्नघरी डाहाका वाजविण्याचे पद्धत रूढ झाली. एक भगत, दोन ते तीन डाहाका वादक एकूणच कमीतकमी तीन व अधिकाधिक पाच लोकांचा संच डाहाका वादनात असायचा. शृंगार, करूण रस व मयतांच्या कहाणीची काव्यात्मक गुंफण करून संचाद्वारे गाणी गायली जायची. कुटुंबातील व्यक्ती कंटाळू नयेत, याकरिता वेळीच चाल बदलण्याचीही हातोटी संचाला असायची. एका पायाची घडी घालून व दुसरा पाय डाहाकाच्या मधोमध थेट ठेवून डाहाका वाजविला जायचा. परंतु आता कुळदेवता व मयतांचे अंगात येणे याविषयी जनजागृती झाल्याने लोकांमधील अंधश्रद्धेचे पारणे फिटत आहे. मात्र विपरित परिणाम होऊन गायन प्रकारातील हे लोकवाद्य नादासह लूप्त होत आहे.
लग्नविधी देवकारणातील हरवतोय नाद
By admin | Updated: May 4, 2015 01:37 IST