३०० नागरिकांची उपस्थिती : रोजगार सेवकाला हटविण्याची मागणीगडचिरोली : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोदली येथील ग्रामरोजगार सेवक तुमदेव सुखरू नैताम याला पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी बोदली येथील जवळपास ३०० रोहयो मजुरांनी पंचायत समिती गाठली व संवर्ग विकास अधिकारी तसेच सभापती यांना निवेदन देऊन चर्चा केली. बोदली येथील ग्रामरोजगार सेवक तुमदेव नैताम हा महिला मंजुरांविरोधात अपशब्द उच्चारते. कामाचे मोजमाप योग्यरितीने करीत नाही. त्यामुळे दिवसभर काम केलेल्या मजुरांना केवळ ७५ ते ८० रूपये मजुरी पडली आहे. बोगस मजुरांची नावे मस्टरवर चढवून त्यांनी रक्कमही हडप केली आहे. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेच्या कामावर २०१४ मध्येच मुदत संपलेली औषधे आणण्यात आली होती. सदर औषधे वापरल्याने मजुरांना फोड आले होते. त्यामुळे या सर्व प्रकारांमुळे बोदली येथील नागरिक मागील एक वर्षापासून त्रस्त झाले आहेत. १ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीवर संपूर्ण मंजुरांनी धडक दिली. सभापती देवेंद्र भांडेकर, संवर्ग विकास अधिकारी पचारे यांच्यासोबत चर्चा केली. ग्रामरोजगार सेवकाला १५ दिवसांच्या आत न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. विस्तार अधिकारी बोपनवार यांना मंगळवारी प्रत्यक्ष चौकशीसाठी बोदली येथे पाठविली जाईल. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन बीडीओ पचारे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. आंदोलनाचे नेतृत्व सरपंच आकाश निकोडे, उपसरपंच देवेंद्र पिपरे, भास्कर मोहुर्ले, लता मडावी, रेणुका निकोडे, शोभा निकोडे, नितीन कुनघाडकर, अनिल मोहुर्ले, तानाजी पिपरे यांनी केले.पंचायत समितीचेही दुर्लक्ष ग्रामरोजगार सेवक तुमदेव नैताम याच्या मनमानीने बोदलीवासीय त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्याला ग्रामरोजगार सेवक या पदावरून हटविण्यात यावे, असा ठराव मागील चार ग्रामसभामध्ये घेण्यात आला व त्याची प्रत पंचायत समितीला पाठविली आहे. मात्र पंचायत समिती प्रशासन मागील एक वर्षांपासून नैतामवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी पंचायत समितीवर धडक दिली.
बोदलीतील रोहयो मजुरांची पंचायत समितीवर धडक
By admin | Updated: February 2, 2016 01:24 IST