गडचिरोली : शहरातील महिला रूग्णालयासमोर असलेल्या खासगी बसच्या थांब्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली आगारातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या सर्वच एसटी बसेस या ठिकाणी थांबतात. बसच्या थांब्यापासून १०० किमी अंतरावर खासगी प्रवासी वाहने उभी ठेवण्यास नियमानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र हा नियम धाब्यावर बसत खासगी बसेस या ठिकाणी उभ्या ठेवल्या जात आहेत. विशेष म्हणजे, खासगी बसेस या ठिकाणावरूनच प्रवासाला सुरूवात करीत असल्याने प्रवाशी मिळेपर्यंत तासन्तास याच ठिकाणी उभे ठेवतात. रस्त्याच्या बाजुला खासगी प्रवाशी वाहने उभी राहत असल्याने बसला पुरेशी जागा राहत नाही. त्यामुळे एसटी बस नाईलाजास्तव रस्त्यावरच उभी ठेवून प्रवाशी भरले जातात. तो पर्यंत मागून येणाऱ्या वाहनांना जागा राहत नसल्याने बस सुरू होत पर्यंत इतरही वाहने उभीच ठेवावी लागतात. अशा प्रकारे दिवसातून अनेक वेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. बऱ्याच वेळा या ठिकाणी वाहनांची मोठी रिघ लागते. दिवसभर चालणाऱ्या या समस्येने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उभ्या असलेल्या खासगी वाहनांवर प्रतिबंध घालावा, अशी मागणी अनेकवेळा वाहतूक पोलिसांकडे केली जात आहे. मात्र वाहतूक पोलीस यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याने दिवसभर वाहतुकीच्या कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
महिला रूग्णालयासमोर वाहतुकीची कोंडी
By admin | Updated: April 30, 2015 01:41 IST