मानापूर/ देलनवाडी : जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून धानपीक अनेक शेतकरी काढतात. खरीप हंगामात संपूर्ण शेती क्षेत्रात धानपिकाची लागवड केली जाते. तसेच उन्हाळी हंगामातही धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. आरमोरी तालुक्यातील वैरागड, मानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीघाटावर उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. परंतु खोब्रागडी नदीपात्र कोरडे झाल्याने धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान लागवडीचे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी विविध जातींच्या धानाची लागवड करीत असतात. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र धान लागवडीखाली असतो. त्यानंतर सुरू होणाऱ्या रबी हंगामात बहुतांश शेतकरी तैलवर्गीय तसेच डाळ वर्गीय पिकांची लागवड करतात. त्यानंतर उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. उन्हाळ्यात बहुतांश शेतकरी मध्यमप्रतिच्या धानाची लागवड करतात. मानापूर परिसरातील देलनवाडी, मानापूर, सुकाळा, मोहझरी तसेच वैरागड परिसरातील करपडा, लोेहारा आदी गावांसह इतर गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीलगत उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. सध्या पीक जोमात येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकाला फुटवेही येत आहेत. परंतु नदीचे पात्र आटत असल्याने धानपीक अडचणीत आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नदीत पंप लावून शेतीला पाण्याची व्यवस्था केली. परंतु नदीतील पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने शेतीला पाणी पुरवठा करतांना अडचणी येत आहेत. परिणामी ज्या शेतकऱ्यांकडे विहीर अथवा अन्य जलस्त्रोत नाहीत. असे शेतकरी दुहेरी संकटात सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी प्रणाली राबवावी, अशी मागणी होत आहे. पाण्याची पातळी आणखीच खोलवर गेल्याने नदी पात्रात निर्माण करण्यात आलेले पंप पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहेत. याचा फटका शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानपिकाला बसत आहे. अनेक शेतातील धानपीक करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्यास आडकाठी येत आहे. (वार्ताहर)
नदीपात्र कोरडे; धान पीक करपले
By admin | Updated: April 29, 2015 01:40 IST