गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील अडपल्ली (गोगाव) येथे सुरू असलेले नगराळे कंस्ट्रक्शन कंपनीचे ‘हॉटमिक्स डांबर प्लॉन्ट’मुळे परिसरात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला असून याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामपंचायत अडपल्लीद्वारे करण्यात आली असली तरी चंद्रपूर येथील प्रदषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.या मार्गावर नागपूरकडे रोज मोठी वाहतूक सुरू असते. मात्र, सदर हॉटमिक्स डांबर प्लॉन्ट सुरू झाल्यानंतर त्यातून निघणारा धुर दिवसभर परिसरात फिरत राहतो. या धुराच्या लोंढ्यामुळे राज्य मुख्य मार्गावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे या धुरामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना वाहन चालविताना अडथळा निर्माण होत आहे. करीता अपघाताच्या प्रमाणांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. परिसरात गोगांव, अडपल्ली या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. या धुरामधून निघणाऱ्या प्रदूषित वायुमुळे लहान मुलांना श्वसन व फुफ्फुसाचे विकार जडत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर व सदर कंपनीला वारंवार निवेदने पाठविली आहेत. परंतु, याकडे नगराळे हॉटमिक्स कंपनीने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परिसरात विविध उपयोगासाठी इमारती उभ्या केल्या असून या इमारतींमध्ये प्रदूषणामुळे धुळीचा थर साचत आहे. परिणामी, इमारती असणाऱ्या व्यक्तींना चिंता निर्माण झाली आहे. शाळा व महाविद्यालये या परिसरात असून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम निर्माण होत असून गंभीर आजाराला बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर असून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर याद्वारे जिल्ह्यातील विविध उद्योगांकडे प्रदुषणाबाबत दरवर्षी तपासणी केली जाते. मात्र, ही तपासणी थातुरमातूर होत असल्याचे दिसून येते. गेले दोन ते तीन वर्षांपासून सदर हॉटमिक्स प्लॉन्टमधील धुराचा प्रश्न गंभीर असताना याकडे संबंधित मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिसत नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने व विविध शिक्षण संस्थांनी याबाबत वारंवार तक्रारी देऊनही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या कंपन्यांनी सदर प्लॉन्टमधून निघणारा धुर दुसरीकडे वळविण्यासाठी विविध उपाय आहेत. मात्र, ते उपाय न करता जनतेच्या जीवनाशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘हॉटमिक्स प्लॉन्ट’मुळे प्रदूषणाचा धोका
By admin | Updated: April 18, 2016 03:54 IST