वडेट्टीवारांच्या उपस्थितीत प्रवेश : नागपुरात झाला पक्ष प्रवेश सोहळागडचिरोली : अहेरी विधानसभा मतदार संघात नगर पंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अशा स्थितीतच अहेरीचे पं.स. सदस्य ऋषी पोरतेट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर हा प्रवेश सोहळा ११ सप्टेंबर रोजी पार पडला.यावेळी काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा परिषद सदस्य पेंटारामा तलांडी, काँग्रेसच्या अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष मुस्ताक हकीम, भामरागडचे तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, राजू वड्डे, कुडयामी, अहेरीचे ज्येष्ठ काँग्रेस नेते चंदू बेझलवार, समय्या कुळमेथे, तिरूपती चिट्टीयाला, रवी कारसपल्ली, राहुल आईलवार आदी उपस्थित होते. पं.स. सदस्य ऋषी पोरतेट यांच्यासह श्रीनिवास गावडे व ग्रा.पं. सदस्य अजय आत्राम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यांच्या पक्ष प्रवेशामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वासही आमदार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ऋषी पोरतेट हे माजी आमदार दीपक आत्राम यांचे कट्टर व निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून या परिसरात ओळखले जात होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आत्राम व पोरतेट यांच्यात मतभेद झाल्याने ते त्यांच्यापासून विभक्त झाले होते व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा निवडणूक प्रचार त्यांनी केला होता. त्यानंतर आता सप्टेंबर २०१५ मध्ये ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. पोरतेट यांच्या प्रवेशामुळे माजी आमदार दीपक आत्राम यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश अडचणीत येण्याची चिन्ह असल्याचे या प्रवेश सोहळ्याला उपस्थित अहेरी विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. अहेरी क्षेत्रात सध्या दीपक आत्रामांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा रंगत आहेत.
ऋषी पोरतेट गावडेसह काँग्रेसमध्ये दाखल
By admin | Updated: September 13, 2015 01:21 IST