झिंगानूर परिसरातील धान करपले : १० बाय १० च्या प्लॉटमध्ये केवळ ८.५ किलो उत्पादन झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बहूतांश गावांमधील धानपिक करपले आहे. जनावरांना चारा म्हणून अनेक शेतकरी धान पिकाची कापणी करीत आहेत.झिंगानुर परिसरात झिंगानूर चेक नं. १, झिंगानूर चेक नं. २, झिंगानूरमाल, वडदेली, येडसिली, मंगीगुड्डम, पुलीगुड्डम, सिरकोंडा, अमडेली, गांगनूर, कोत्तागुड्डम, रोमपल्ली, लोवा, कल्लेड, रमेशगुड्डम, कर्जेली, किष्टयापल्ली, कोर्लामाल, कोर्लाचेक, पातागुड्डम, पेंडलाया, रायगुड्डम, कोपेला, सोमनपल्ली, सोमनूर या गावांचा समावेश आहे. या सर्वच गावांमध्ये धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र या परिसरात लहान बोड्या वगळता एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. याच परिसरातुन इंद्रावती नदी वाहते मात्र या नदीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होऊ शकेल अशी यंत्रणा कार्यरत नाही. याावर्षी या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले परिणामी धानपिक पुर्णपणे करपले आहे. धानाची वाळून तणीस झाली आहे. यातुन धान लागवडीचा तर सोडाच धान कापणीचाही खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. मात्र धान पीक करपले असले तरी जनावरांसाठी चारा होईल या उद्देशाने धानपिकाची कापणी करण्यात येत आहे. कृषी विभागाने झिंगानूर परिसरात पाहणी केली असता १० बाय १० च्या प्लॉटमध्ये केवळ ८ किलो ४८० ग्रॅम धानाचे उत्पादन झाले असल्याचे दिसून आले आहे. या उत्पादनातून शेती कसण्याचा खर्चही भरून निघणे कठिण झाले आहे. त्यामुळे सदर परिसर दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
तणसीसाठी धान कापणी सुरू
By admin | Updated: November 30, 2015 01:16 IST