जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाबाबत संयुक्त बैठक देसाईगंज : वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेली जमीन संपादन करण्याकरिता महसूल, वन तसेच रेल्वे विभागामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मार्गावर लहान, मोठे पूल उभारून प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी महसूल विभागाच्या अखत्यारितील जमीन फेब्रुवारी महिन्याच्या अखेर अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे विभागाला देण्यात येणार आहे. याशिवाय मार्गाच्या विकासासाठी रेल्वे विभागाला जमिनीचा आगाऊ ताबा देण्याची कारवाई जवळपास पूर्ण झाली आहे, अशी मागणी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी नायक यांनी बुधवारी देसाईगंजच्या उपविभागीय कार्यालयात वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाबाबत महसूल, वन व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता एम. सी. पात्रा, कार्यकारी अभियंता गोस्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी शासकीय जमीन संपादन करण्यापूर्वी रेल्वे, वन, महसूल विभागाचे संयुक्त सर्वेक्षण होणे आवश्यक आहे व सदर सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मार्गासाठीच्या प्रस्तावित संपूर्ण जमिनीचा सर्च रिपोर्ट संदर्भात माहिती घेणे सुरू आहे. याबाबतची जबाबदारी गडचिरोली व देसाईगंज येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. खोब्रागडे, गाढवी व कठाणी नदीवरील मोठे पूल तसेच लहान-मोठ्या नद्या, नाले, इटियाडोह कालव्यातील पाणी सरळ मार्गाने वळते करण्यासाठी लहान-मोठे भूमिगत पूल उभारण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी महसूल विभागाची जमीन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी) खासगी जमीन संपादनासाठी आॅनलाईन प्रक्रिया गडचिरोली-वडसा या रेल्वे मार्गासाठी महसूल, वन विभागासह खासगी जमिनीही लागणार आहे. सदर खासगी जमीन रेल्वे मार्गाकरिता खरेदी करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वन विभागाची जमीन संपादन करण्याची प्रक्रिया आॅनलाईन सुरू करण्यात आली आहे, असे नायक यांनी सांगितले.
महसूल विभागाची जमीन मार्चमध्ये देणार
By admin | Updated: February 9, 2017 01:36 IST