गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या एकाच कामाचे अनेक तुकडे करून काम वाटप करताना यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या मुख्य अभियंता यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे, अशा प्रकारचा शासन निर्णय ६ मे रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते, पूल, इमारती आदींचे बांधकाम केले जाते. यापैकी रस्त्याच्या कामाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या कंत्राटदारांना देण्याचे प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागात आजपर्यंत मोठ्या प्रमाणात घडत होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारही होत होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुढे एकाच कामाचे तुकडे करताना मुख्य अभियंत्याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तुकडे पाडण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य अभियंत्याकडे पाठविल्यानंतर मुख्य अभियंत्याकडून सदर कामाचे तुकडे पाडणे खरच गरजेचे आहे काय, याची शहानीशा केली जाईल. त्यानंतरच तुकडे पाडण्यास परवानगी दिली जाणार आहे. मुख्य अभियंत्यांनी तुकडे पाडण्याबाबतचा निर्णय घेताना आवश्यक बाबींची तपासणी करावी, आवश्यक अभिलेख पडताळून बघावे व आवश्यक असल्यास मंजुरी प्रदान करावी, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातून देण्यात आला आहे.एकाच कामाचे अनेक तुकडे पाडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार गैरव्यवहार करीत असल्याची प्रकरणे अनेक जिल्ह्यांमध्ये यापूर्वी घडली आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे गैरव्यवहारावर चाप बसेल, अशी अपेक्षा केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातही तुकडे पाडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासही अशा प्रकारची सक्ती करावी, अशी मागणी होत आहे. शासनाच्या या नवीन निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून गैरव्यवहारांवर चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)
बांधकामाचे तुकडे करणाऱ्यावर लगाम
By admin | Updated: May 10, 2015 01:21 IST