चामोर्शी : स्थानिक पोलीस स्टेशन व मुक्तिपथतर्फे शहरातून व्यसनमुक्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान, ६ पानठेल्यांतून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून चाैकात त्यांची होळी करण्यात आली. शहरात कोणीही खर्रा, तंबाखूची विक्री करू नये, असे आवाहन इतर पानठेला धारकांना करण्यात आले.
चामोर्शी शहरात रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने व्यसनमुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने काढून घाेषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. काही पानठेल्यांची तपासणी केली असता ६ पानठेल्यांमध्ये खर्रा, तंबाखू आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेले तंबाखूजन्य पदार्थ रॅलीनंतर नगर पंचायतच्या पटांगणात जमा करून नागरिकांच्या उपस्थितीत होळी करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे यांनी पोलीस जवान व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच तंबाखूच्या सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगितले. सहायक पाेलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आली. यावेळी चामोर्शी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.