गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत इंडियन इन्स्टिट्युट आॅफ युथ वेल्फेअर संस्था गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी तालुक्यातील पोटेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य देखरेख व नियोजन समितीची त्रैमासिक सभा घेण्यात आली. या सभेत आरोग्याच्या विविध प्रश्नांवर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वानुमते महत्त्वपूर्ण १२ ठराव पारित करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी पोटेगावचे सरपंच शेडमाके होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. जी. म्हशाखेत्री उपसरपंच प्रतिभा मोहुर्ले, भाटकर, पर्यवेक्षिका आय. व्ही. गाडगे, मंगला मुक्तेवार आदी उपस्थित होते. पोटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, तसेच सदर कंत्राटदाराचा बांधकामाचा कंत्राट रद्द करण्यात यावा, असाही ठराव नियोजन समितीच्या सभेत घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील समस्यांबाबत जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्याचे या सभेत ठरविण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीचा ठराव
By admin | Updated: August 26, 2015 01:19 IST