शासनदरबारी निर्णय प्रलंबित : २५ मुद्यांच्या आधारे जिल्हा प्रशासनाने पाठविली राज्य शासनाकडे माहिती दिलीप दहेलकर गडचिरोलीभौगोलिकदृष्ट्या व विस्ताराने मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्हा विभाजनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. या अनुषंगाने शासनाने मागितलेली २५ मुद्यांवरील माहिती प्रशासनाने या अहवालात नमूद केली आहे. जिल्हा विभाजनाबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेऊन असल्याने स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.मंत्रीमंडळस्तरावर असलेल्या या समितीत महसूल विभागाचे प्रधान सचिव हे अध्यक्ष आहेत. या समितीकडून सर्वच जिल्हा प्रशासनाला जिल्हा विभाजनाबाबतचा अहवाल मागविण्यात आला होता. यात २५ मुद्यांच्या आधारे माहिती मागविण्यात आली होती. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचा अहवाल तयार केला आहे. सदर अहवाल राज्य शासनाकडे तीन आठवड्यापूर्वी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्हा विभाजन करण्यासंदर्भात जिल्हा पुनर्रचना समितीच्या बैठकीत शासनाने २५ मुद्यांच्या आधारे मागितलेल्या माहितीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित सर्व विभागाकडून माहिती मागून ती जिल्हा प्रशासनाने संकलीत केली. त्यानंतर जिल्हा विभाजनाचा अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आॅगस्ट २०१५ रोजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल विभागाच्या एकूण ८८ पदांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यात सध्या विविध विभागाचे १२७ कार्यालय असून आकृतीबंधानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ९ हजार ३७२ पदे निर्माण करण्यात आली आहेत. नवा अहेरी जिल्हा झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे वाढणार आहेत.कलेक्टर, सीईओ, एसपी कार्यालय होणारगडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास नव्या अहेरी जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण अहेरी निश्चित करणे उचित राहील, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर अहेरी येथे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक हे तीन जिल्हास्तरावरचे कार्यालय नव्याने निर्माण करावे लागणार आहे. तेव्हाच प्रशासकीय कामकाज योग्य होऊन जनतेला न्याय मिळेल. सात ते आठ नवे तालुके होणारजिल्हा विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी शासनाने अहवालात नव्या तालुक्याची संख्या किती राहणार याची माहिती मागितली होती व यात किमान आठ ते बारा तालुक्यांचा समावेश राहावा, असे सूचित केले. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार अहेरी या स्वतंत्र जिल्ह्यात सात ते आठ नवे तालुके राहणार आहेत. जिमलगट्टा, जारावंडी, कमलापूर, पेंढरी आदींसह अन्य नव्या तालुक्याचा समावेश राहणार आहे. शेवटच्या गावाचे अंतर कमी होणारसध्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून शेवटच्या सिरोंचा तालुका मुख्यालयाचे अंतर २२० किमी असून या तालुक्यातील शेवटच्या गावाचे अंतर ३७० किमी आहे. स्वतंत्र अहेरी जिल्हा मुख्यालयापासून सिरोंचा तालुका मुख्यालयाचे अंतर ११० किमी राहणार असून सिरोंचा तालुक्याच्या शेवटच्या गावाचे अंतर १५० किमी राहील, असे सादर केलेल्या अहवालात जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे. याशिवाय भौगोलिक क्षेत्रफळाचे अंतरही कमी होणार आहे. जिल्हा विभाजनाच्या निकषात शिथिलता आवश्यकजिल्ह्याची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा घटक शास्त्रीयदृष्ट्या मुख्य मानून तो शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू करावा, एका तालुक्याची लोकसंख्या अडीच ते तीन लाख गृहीत धरल्यास निर्माण होणाऱ्या नव्या जिल्ह्यात आठ ते बारा तालुके असावेत, तसेच नवनिर्मित जिल्ह्याची लोकसंख्या २४ ते ३० लाख अशी असावी, असे शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य शासनाने नव्या जिल्हा निर्मितीसाठी हेच निकष कायम ठेवल्यास स्वतंत्र अहेरी जिल्हा होण्याची शक्यता फार कमी आहे. राज्य शासनाने स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करण्यासाठी लोकसंख्या व तालुक्याचे सदर निकष शिथील करणे आवश्यक आहे.
स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचा अहवाल सादर
By admin | Updated: December 17, 2015 01:23 IST