कुरखेडा येथे कार्यक्रम : ई. झेड. खोब्रागडे यांचे उपस्थितांना आवाहनकुरखेडा : काही विद्यार्थी गरीब परिस्थितीचा न्यूनगंड बाळगून अभ्यास करून स्पर्धा परीक्षेला सामोरे जात नाही. व्यक्तीमध्ये कला-कौशल्य असतात. त्यांचा विकास करणे संबंधित व्यक्तीवर अवलंबून असते. आत्मविश्वास बाळगून नियमित अभ्यासासह अवांतर वाचन केल्यास यश प्राप्ती शक्य आहे, त्यासाठी अवांतर वाचनावर भर द्यावा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था व श्री गोंविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवडा’ निमित्त आयोजित ‘संविधान रूजवू : हिंसामुक्त समाज घडवू’ या विषयावरील अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात गुरूवारी खोब्रागडे बोलत होते. कार्यक्रमाला जि. प. सदस्य लक्ष्मण मने, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोकुलवार, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रा. महेंद्र मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान उद्देशिकेच्या वाचनाने करण्यात आले. दक्षिण अमेरिकेतील डॉमिनीक रिपब्लिक देशात रॉफेल तुज्जिलो या जुलमी शासकाविरोधात पेटरिया, मारिया व मीनवरा यांनी लढा दिला. मात्र शासकाने त्यांची २५ नोव्हेंबर १९६० रोजी हत्या केली. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने २५ नोव्हेंबर स्त्री हिंसा विरोधी दिन त्यांच्या सन्मानार्थ जाहीर केला, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक शुभदा देशमुख यांनी प्रास्ताविकातून दिली. नातेसंबंध जोपासण्यासाठी सुसंवाद गरजेचा आहे, असे प्रतिपादन डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जमकातन यांनी तर आभार नलिनी आगलावे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
अभ्यासासह अवांतर वाचन करा
By admin | Updated: December 14, 2015 01:36 IST