सेवायोजन कार्यालय ठरतेय कुचकामी
गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते. मात्र, आता ऑनलाइन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगारीची नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे सेवायोजन कार्यालय कुचकामी ठरल्याचे दिसून येते.
सिरोंचा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
सिरोंचा : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. नगर पंचायतीने शहरात फवारणी करावी.
नागरिक उघड्यावरच जातात शौचास
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. मात्र, बांधलेल्या शौचालयाचा १०० टक्के वापर होताना दिसून येत नाही. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. अनेक गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे, हे खरे; पण त्यांचा उपयोग होताना दिसत नाही.
चौक परिसरात स्वच्छतागृहे उभारा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी जागा नाही. काही नागरिक इंदिरा गांधी चौकात असलेल्या सभागृहात लघुशंका करतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे.
व्यसनमुक्तीसाठी ग्रा.पं.ने पुढाकार घ्यावा
गडचिरोली : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाई करून सुगंधित तंबाखूची विक्री करण्यावर पायबंद घातला. गावपातळीवर सुगंधित तंबाखूबंदीसाठी ग्रा.पं.नी पुढाकार घेऊन ग्रामसेवकांना प्रवृत्त करावे, अशी मागणी होत आहे.
सुकन्या योजनेची जनजागृती करा
आष्टी : सुकन्या योजना अत्यंत चांगली आहे. मात्र, या योजनेची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेची जनजागृती होणे गरजेचे आहे.
वनहक्क प्रकरणे रखडली
अहेरी : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केले जाते. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत.
आरमोरी मार्गावर गतिरोधक निर्माण करा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी या मुख्य मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर शहरात बसथांबा, व्यावसायिक दुकाने व शाळा असल्याने येथून विद्यार्थी व नागरिकांचे आवागमन असते. त्यामुळे मार्गावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे. गतिराेधकांअभावी वाहनधारक सुसाट वाहने चालवित असल्याने अपघाताचा धाेका आहे.
गावांमध्ये निस्तार डेपो देण्याकडे दुर्लक्ष
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली.
जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले
गडचिरोली : भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर धान पीक निघाल्यानंतर त्याच शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे वळत चालला आहे.