उचल केली नाही : ८२ लाखांचे धान धोक्यात घोट : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र भाडभिडी (बि.) येथे खरेदी करण्यात आलेले संपूर्ण धान्य उघड्यावर आहे. आतापर्यंत खरेदी केलेला एकूण ८२ लाख ३२ हजार ८ रूपयांचा माल धोक्यात येण्याची शक्यता आहे. भाडभिडी (बि.) येथे १५ नोव्हेंबर २०१६ ला धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तेव्हापासून महामंडळाच्या वतीने अद्यापही येथील एकही क्विंटल धानाची उचल करण्यात आली नाही. खरेदी करण्यात आलेल्या मालामध्ये १५ हजार ४३ धानाचे आधारभूत धान कट्टे यांचे वजन ६ हजार १७ क्विंटल आहे. सदर धानाची किंमत ८० लाख ४४ हजार ९९० आहे. २३९ एकल धान कट्ट्याचे वजन ९५.६० क्विंटल असून याची किंमत १ लाख ८७ हजार १८ रुपये आहे. केंद्रावर १८ फेब्रुवारीपर्यंत एकूण ६११२.६० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. या धानाची किंमत एकूण ८२ लाख ३२ हजार ८ रूपये असून संपूर्ण माल उघड्यावर आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना ८१ लाख ३ हजार १२४ चुकारा देण्यात आला आहे. १ लाख २८ हजार ८८४ रूपयांचा चुकारा अद्यापही बाकी आहे. (वार्ताहर)
भाडभिडी केंद्रावरील धान उघड्यावर
By admin | Updated: February 19, 2017 01:15 IST