गडचिरोली : प्रेमाचे आमिष दाखवून चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर गावालगतच्या जंगल परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीस १४ वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंड तसेच त्याच्या सहकारी चार आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी मंगळवारी सुनावली.विद्यासागर हरिश्चंद्र धोती (२८) रा. अनंतपूर ता. चामोर्शी असे शिक्षा झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुरूदास यमाजी दलाई रा. अनंतपूर, लोकसिंग मंगस्पद धोती, पतिराम ऋषी नेवारे रा. कुदर्शीटोला, गुलाबसिंग यांचा सहकारी आरोपींमध्ये समावेश आहे. सदर प्रकरणाची तक्रार पीडित मुलीच्या वडिलाने चामोर्शीच्या पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी आरोपी विद्यासागर धोती, गुरूदास दलाई, गुलाबसिंग धोती, लोकसिंग व पतिराम नेवारे या पाच जणांवर भादंविचे कलम ३७६, ३६३, ३६६ व सह कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणात सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी साक्षीपुरावे तपासून व दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणातील मुख्य आरोपी विद्यासागर धोती याला भादंविचे कलम ३६३ अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास, कलम ३६६ अंतर्गत चार वर्ष कलम ३७६ अन्वये सात वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. उर्वरित चार आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल प्रधान यांनी या खटल्यात काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)अनंतपूरपासून मंचेरियलपर्यंत असा घडला प्रकार४१८ जानेवारी २०१० रोजी पीडित शाळकरी मुलगी दुपारच्या सुटीत शाळेच्या मागील जंगल परिसरात शौचास गेली. दरम्यान, विद्यासागर हरिश्चंद्र धोती याने तिला पे्रमाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व तिला रात्रभर जंगलात ठेवले. त्यानंतर गुरूदास दलाई याला फोन करून सुमो जीप आणण्यास सांगितले. त्यानंतर लोकसिंग धोती हा टाटासुमो व कपड्याचे सुटकेस घेऊन सदर जंगल परिसरात आला व त्याने पाच हजार रूपये विद्यासागर याला दिले. त्यानंतर विद्यासागर हा पीडित मुलीला घेऊन आंध्र प्रदेशाच्या मंचेरियल येथे गेला व सदर मुलीवर त्याने अत्याचार केला. गुलाबसिंग धोती हा विद्यासागर धोती याला पैशाचा पुरवठा करीत होता. पतिराम नेवारे याने विद्यासागर याला कपडे व पाच हजार रूपये नेऊन दिले. त्यानंतर विद्यासागर हा पीडित मुलीला भाड्याच्या खोलीवर ठेवून तब्बल दीड वर्ष तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती राहिली व तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर विद्यासागर हा पीडित मुलीला मारहाण करून त्रास देत होता.
बलात्कारी पाच आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा
By admin | Updated: May 4, 2016 02:31 IST