गडचिरोली : पीडित विधवा महिला पाणी घेऊन शेती कामासाठी आपल्या शेतात जात असताना तिला अडवून बळजबरीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी नऊ वर्षाचा सश्रम कारावास व दीड हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. कैलास हरीजी मैंद (२८) रा. अरसोडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने लागलीच या घटनेची तक्रार आरमोरी पोलीस ठाणे गाठून कैलास मैंद याच्या विरोधात दाखल केली. या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी कैलास मैंद याच्या विरोधात भादंविचे कलम ३४१, ३५४, ४२७ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मैंद याला अटक केली. आरमोरीचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक रवींद्र पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी मैंद याच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सत्र न्यायाधिश यू. एम. पदवाड यांनी दोन्ही बाजुच्या साक्षीदारांचे बयान नोंदवून तसेच सरकारी पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी कैलास मैंद याला ३४१ कलमान्वये एक महिना, ३५४ कलमान्वये दोन वर्ष कारावास व एक हजार रूपयाचा दंड तसेच भादंविचे कलम ३७६ अन्वये दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पाहिले(स्थानिक प्रतिनिधी)असा झाला प्रयत्नपीडित विधवा महिला ९ जून २०११ रोजी दुपारी ३ वाजता ब्रह्मपुरी-आरमोरी रोडच्या पलिकडील आपल्या शेताकडे नहराच्या पाळीने जात होती. दरम्यान सायकलने जात असलेला कैलास मैंद याने सायकलवरून खाली उतरून पीडित महिलेचा हात धरला. त्यानंतर बळजबरीने तिला नहरामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढयात घटनास्थळी एक ट्रॅक्टर आल्यामुळे पीडित महिलेने कैलास मैंद याच्या तावडीतून आपली सुटका केली. घटनास्थळी पीडित महिला व कैलास मैंद यांच्यात झटापटी झाली. यात महिलेचे मंगळसूत्र घटनास्थळावर तुटून पडले.
बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास
By admin | Updated: June 14, 2016 00:45 IST