कमलापूर, धानोरा कडकडीत बंद : आंतरराज्यीय बसेसवरही परिणामगडचिरोली : २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत माओवादी संघटनेतर्फे नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी अहेरी तालुक्यातील कमलापूर व धानोरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली. तर एटापल्ली येथे पोलिसांनी मेळावा घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच एटापल्ली, पेरमिली येथे जनजागृती रॅली पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली. नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला सडेतोड उत्तर देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून एटापल्ली या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नक्षल विरोधी शांतता रॅली काढण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला मार्गदर्शन करताना नलावडे यांनी भरकटलेल्या नागरिकांना कोणतीही मदत करू नका, लोकशाही मार्गाने विकास शक्य आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, उपनिरीक्षक मदने, दवळी, देवरे यांच्यासह ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पेरमिली येथेही उपपोलीस ठाण्यांतर्गत नक्षल विरोधी रॅली काढण्यात आली. पेरमिलीचे ठाणेदार चांगदेव कोडेकर, सीआरपीएफचे कमांडंट राजकुमार, उपनिरीक्षक निमगिरे, हेमंत बोडे, मेजर झाडे, चांदेकर आदी उपस्थित होते. धानोरा तालुका मुख्यालयात मंगळवारी बाजारपेठ बंद होती. मुरूमगाव येथील आठवडी बाजारही मंगळवारी भरला नाही. धानोराचे दुकान सकाळपासूनच बंद होते. धानोरावरून दररोज चालणारी खासगी व परिवहन महामंडळाची बससेवाही प्रभावीत झाली. परिवहन मंडळाच्या बसगाड्या गडचिरोलीवरून धानोरापर्यंतच गेल्या. धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील गोडलवाही, कारवाफा, पेंढरी, मालेवाडा, मुरूमगाव आदी बसफेऱ्या आज बंद होत्या. चंद्रपूरवरून राजनांदगावकडे जाणारी खासगी प्रवासी वाहतुकीची वाहनेही आज बंद होती. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथेही बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. कोरची येथेही पहिल्या दिवशी बाजारपेठ बंद होती. एटापल्ली तालुक्यात एटापल्ली-जारावंडी, गेदा व बोलेपल्ली आदी मार्गावरील बस व खासगी वाहतूक दिवसभर बंद होती. यामुळे एटापल्लीच्या आठवडी बाजारावर परिणाम झाला. जिल्ह्यात नक्षल सप्ताहाच्या पहिल्या कुठलीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रॅली
By admin | Updated: July 29, 2015 01:46 IST