चामोर्शी : वन विभाग आलापल्ली येथील वनपरिक्षेत्र घोट अंतर्गत येणाऱ्या गरंजी या दुर्गम गावात वन विभागाच्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रम राबविण्यात आला. वृक्ष संवर्धनाचे महत्व जाणून महिलांनी वृक्षांना सर्वप्रथम राखी बांधून कार्यक्रमाची सुरूवात केली. ‘आधी राखी झाडांना, नंतर भावाला’ हा उपक्रम गरंजी येथे राबविण्यात आला.वन विभाग व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंजी येथे रक्षाबंधन कार्यक्रम राबविण्यात आला. शासनातर्फे दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम शाळा, महाविद्यालय व रस्त्यांच्या दुतर्फा तसेच जंगल परिसरात नर्सरीच्या रूपाने केले जाते. त्यानंतर रोपांची काळजी वर्षभरातून एकदाही घेतली जात नाही. परिणामी निम्म्यापेक्षा सर्वाधिक वृक्ष जीवंत राहत नाही. त्यामुळे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी केलेला शासनाचा खर्च वाया जातो. वृक्षारोपण करून इतर विभाग आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. मात्र वृक्ष संवर्धनासाठी जबाबदारी कुणीही घेत नाही. ही बाब लक्षात घेऊन गरंजी येथील महिला व शाळेच्या विद्यार्थिनींनी वृक्ष संवर्धन करण्यासाठी भावाला राखी बांधण्यापूर्वी झाडांना राखी बांधून वृक्ष संवर्धन करण्याचा प्रण घेतला.लोकसहभागातून रक्षाबंधन हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी घोट वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील, क्षेत्र सहायक व्ही. डब्ल्यू. नरखेडकर, शिक्षक कारखेले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक परचाके, पी. एम. नंदगीरवार, आर. आर. वासेकर, पी. एन. राजुरकर, वाय. एच. लाडे, एन. टी. बोरकर, मंडल यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
‘आधी राखी झाडाला, नंतर भावाला’ उपक्रम
By admin | Updated: August 11, 2014 23:56 IST