चामोर्शी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चामोर्शी नगर पंचायतीची निवडणूक लढविणार असून सर्वच १७ ही जागा स्व बळावर लढणार असून यात विजय संपादन करेल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी केले. येथील स्व. केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोरेड्डीवार बोलत होते. यावेळी राकाँचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर, अरूण हरडे, अमिन लालानी, तालुकाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, रायुकाँचे प्रदेश सचिव अमोल आईंचवार आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना सुरेश पोरेड्डीवार म्हणाले, राकॉ कार्यकर्त्यांनी चामोर्शी शहरात तन- मन- धनाने काम करून पक्ष संघटन मजबूत करावे, राष्ट्रवादी काँग्रेस चामोर्शी शहरात सर्व वॉर्डात विकासाभिमुख व सक्षम उमेदवारांची निवड करून पूर्ण ताकदीने नगर पंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्तापित करील, असा विश्वास, पोरेड्डीवार यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला अशोक धोडरे, रितेश पालारवार, प्राचार्य जयंत येलमुले, अनिल तुरे, राजेश्वर पिपरे, विवेक सहारे, धमेंद्र दुबे, आकाश सातपुते, अविनाश चौधरी, प्रशांत मातोरे, विनोद भोगावार, बंडू उंदीरवाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)सर्वच पक्षाचे कार्यकर्ते फार्मात४शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी चामोर्शीत येऊन नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर तडकाफडकी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना सज्ज केले. त्यापाठोपाठ राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनीही मेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आपल्या बड्या नेत्यांना चामोर्शीत बोलावून मेळावा घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांची प्रतीक्षा करीत आहेत. एकूणच निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
राकाँ सर्व जागा स्वबळावर लढणार
By admin | Updated: September 2, 2015 01:17 IST