काेराेनाचा प्रसार आता ग्रामीण व दुर्गम भागातही हाेण्यास सुरुवात झाली आहे. अनेक आदिवासी बांधव काेराेनाने बाधित झाले आहेत, तर काही जणांना प्राणही गमवावे लागले आहे. सध्या जिल्ह्यात काेराेना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रावर लस उपलब्ध आहे. मात्र, दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांमध्ये लसीविषयी चुकीची माहिती असल्याने ते लस घेण्यास तयार नाहीत. एकीकडे शहरात लस घेण्यासाठी स्पर्धा आहे, तर दुसरीकडे दुर्गम भागातील केंद्रांवर लसी पडून आहेत.
आदिवासी समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत जागृतीची माेहीम सुरू करण्याची गरज आहे. आपल्या समाजाचे ऋण फेडण्याची चांगली संधी या माध्यमातून आदिवासी समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली आहे. ज्या भागात आदिवासी कर्मचारी कार्यरत असेल, त्याने तेवढी गावे आपले कार्यक्षेत्र माणून प्रत्यक्ष गाव व टाेल्यावर जाऊन लस घेण्याविषयी नागरिकांमध्ये जागृती करावी. एकही आदिवासी काेराेनाने मरणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एखादा आदिवासी बांधव दवाखान्यात उपचार घेत असेल, तर त्याला आवश्यक असलेल्या औषधाेपचारासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन माधवराव गावळ यांनी केले आहे.