३३ क्षेत्र तर ६६ गण : जिल्हा परिषदेसाठी २७७, पंचायत समितीसाठी ३५६ नामांकन अर्ज सादर गडचिरोली : पहिल्या टप्प्यातील ३३ जिल्हा परिषद व ६६ पंचायत समिती गणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी समाप्त झाली. अखेरच्या दिवशी आठ तालुक्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आठ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण ६३३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या ३३ क्षेत्रासाठी २७७ तर पंचायत समितीच्या ६६ गणासाठी ३५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विविध राजकीय पक्ष व आघाड्यांच्या उमेदवारांनी तालुका मुख्यालयात जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली तालुक्यात पाच जि. प. क्षेत्रासाठी ४२ तर १० पं. स. गणांसाठी ५३ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. चामोर्शी तालुक्यात ९ जिल्हा परिषद क्षेत्रासाठी ७२ नामांकन अर्ज तर १८ पं. स. गणासाठी १०६ नामांकन दाखल झाले आहेत. धानोरा तालुक्यातील ४ जि. प. क्षेत्रासाठी २६ तर पंचायत समितीच्या ८ गणांसाठी ४२ नामांकन दाखल झाले आहेत. देसाईगंज तालुक्यातील ३ जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी २९ तर ६ पंचायत समिती गणांसाठी ४० नामांकन सादर झाले आहेत. कुरखेडा तालुक्यातील ५ जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी २७ नामांकन तर १० पंचायत समिती गणासाठी ४९ नामांकन सादर झाले आहेत. आरमोरी तालुक्यातील ४ जिल्हा परिषद क्षेत्रासाठी २८ नामांकन तर ८ पंचायत समिती गणासाठी ३९ नामांकन सादर झाले आहेत. कोरची तालुक्यातील २ जिल्हा परिषद क्षेत्रासाठी १२ तर ४ पंचायत समिती गणासाठी २४ नामांकन दाखल झाले आहेत. (नगर प्रतिनिधी) एबी फॉर्मसाठी लांबले नामांकन अर्ज सर्वच राजकीय पक्षांकडे उमेदवारांची गर्दी झाली होती. बंडखोरी थांबविण्यासाठी एबी फार्मचे वितरण बुधवारी केले. नामांकन अर्ज भरतेवेळीच एबी फॉर्म सादर करायचा होता. एबी फॉर्ममुळेच नामांकन अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत लांबले. नामांकन अर्ज भरण्यास २७ जानेवारीपासून सुरूवात झाली होती. मात्र पाच दिवस उलटूनही बोटावर मोजण्याइतक्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शेवटच्या दिवशी नामांकन वाढले. एकाच दिवशी नामांकन आल्याने निवडणूक विभागाचाही गोंधळ उडाला.
शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस
By admin | Updated: February 2, 2017 01:17 IST