रोवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ : चढ भागातील शेतजमीन पडल्या कोरड्या विसोरा : ७ ते १३ जुलैदरम्यान देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याने भरल्या. तसेच शेतातही पाणी जमा झाले. मात्र त्यानंतर १५ दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे चढ भाग असलेल्या शेतजमिनी कोरड्या पडल्या असून या शेतजमिनीती धानपिकाची रोवणी करण्यासाठी अनेक शेतकरी पंपाद्वारे शेतीला पाणी पुवठा करीत आहेत. धान पिकाच्या रोवणीसाठी पऱ्ह्यांना पाणी आवश्यक आहे. तसेच रोवणीची चिखलणी करण्यासाठी भरपूर पावसाची आवश्यकता असते. मात्र चढ भागातील शेतजमिनीतील पाणी आटल्यामुळे अनेक शेतकरी शेतीला पाणी पुरवठा करण्याची धावपळ करीत आहेत. देसाईगंज तालुक्याच्या शंकरपूर, चोप परिसरातील चढ भागातील शेतकरी रस्त्यालगतच्या खड्ड्यातील पाणी पंपाद्वारे डांबरी रस्त्यावर पाईप लांबवून शेतजमिनीपर्यंत पोहोचवित असल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाचे उशीरा आगमन झाल्याने धान पिकाची पेरणी उशीरा झाली. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे अतिवृष्टीमुळे कुजले. परिणमी चिखल करून धानवाफे टाकण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ टक्के रोवणीचे कामे आटोपली असून एकूण भात लागवड क्षेत्रापैकी ३७ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी करण्यात आली आहे. अद्यापही धान पिकाच्या रोवणीचे ५० टक्के काम शिल्लक आहे. (वार्ताहर) मुसळधार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा १३ जुलैनंतर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. दररोज वा अधूनमधून हलकासा पाऊस होत आहे. मात्र या पावसाने शेतजमिनीत पाणी साचत नाही. हलक्याशा पावसाचे पाणी रात्रभरात आटून जाते. रोवणीसाठी भरपूर पावसाची गरज असल्याने मुसळधार पाऊस होणे आवश्यक आहे. शनिवारी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्हाभरात ५.० मिमी पाऊस झाला व आतापर्यंत एकूण ८३६.२ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या १५ दिवसापासून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाची दडी, पंपाद्वारे शेतीला पाणी
By admin | Updated: August 1, 2016 01:22 IST