गडचिरोली : आरमोरी पंचायत समितीचे सदस्य सचिन महाजन यांनी १८ जुलै रोजी सोमवारी आयोजित पं.स.च्या मासिक सभेत महिला गट शिक्षणाधिकारी हेमलता परसा यांना अर्वाच्च, असभ्य व उर्मट भाषेत बोलून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. इतकेच नव्हे तर मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, गट साधन केंद्राच्या इमारतीच्या मुद्यावर त्यांना तासभर सभेत उभे ठेवले, असा आरोप करीत सदर प्रकार अत्यंत निंदनीय असल्याने पं.स. सदस्य महाजन यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.पत्र परिषदेला आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे, प्रसिध्द प्रमुख डॉ. पितांबर कोडापे, वनिशाम येरमे आदी उपस्थित होते. यावेळी येरमे व कोडापे यांनी सांगितले की, आरमोरीचे पं.स. सदस्य सचिन महाजन हे शिवाजी विद्यालय वैरागड येथे शिक्षक पदावर कार्यरत आहे. या शाळेतील इयत्ता पाच ते सातवीचे वर्ग विनाअनुदानित तत्वावर आहे. शासन नियमानुसार या वर्गांना शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश या योजना लागून नाहीत. असे असतानाही पं.स. सदस्य महाजन हे माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला नाही. उलट मोफत पाठ्यपुस्तके विकून पैसे कमाविले. आतापर्यंत विनाअनुदानित शाळांना मोफत पाठ्यपुस्तके मिळत होती. तसेच वरील योजना लागू होत्या. असे म्हणून परसा यांना सभेत धारेवर धरले, असे येरमे व कोडापे यांनी सांगितले. महाजन यांनी कॅबिनमध्ये जाऊनही परसा यांना अपमानास्पद वागणूक दिली, असेही ते म्हणाले. याबाबत परसा यांनी जि.प. सीईओकडे तक्रार केली आहे.गट शिक्षणाधिकारी परसा यांना आपण अपशब्दाने बोललो नाही व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली नाही. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णत: निराधार आहेत. विनाअनुदानित शाळांना पुस्तके मिळण्यासाठी शासन व शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून पाठपुरावा करा, अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली. शिवाय माझ्या शाळेसाठी इयत्ता सहावीचे पाठ्यपुस्तके देण्यात यावे, अशी मागणी केली. लोकप्रतिनिधीच्या नात्याने आपण परसा यांना मासिक सभेत जाब विचारला. मात्र त्यांना शिविगाळ केली नाही.- सचिन महाजन, पं.स. सदस्य आरमोरी
प.स. सदस्याकडून बीओंना अपमानास्पद वागणूक
By admin | Updated: July 20, 2016 01:10 IST