धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
वैरागड : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र, या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
नळाला तोट्या नसल्यास कारवाई करा
अहेरी : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. तोटी नसल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात केरोसीनचा काळाबाजार
गडचिराेली : गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरातील ग्रामीण भागात केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. गरीब, सर्वसामान्य कुटुंबांना केरोसीन मिळण्याऐवजी ट्रकमालकांना केरोसीन दिले जात आहे. गरिबांना केरोसीन वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.
खोब्रागडी नदी पुलावर कठड्यांचा अभाव
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावाजवळून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर १० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी या पुलावर लोखंडी संरक्षक कठडे लावण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच हे संरक्षक कठडे यंत्रणेने काढले. तेव्हापासून या पुलावर संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यावर बांधकाम साहित्य
आरमाेरी : शहरात विविध भागांत घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळ्या तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळ्या आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र, याकडे न.प.चे दुर्लक्ष आहे. साहित्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्या सुमारास या मोकाट जनावरांमुळे अपघात वाढले आहेत.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
काेरची : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. बहुतांश स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे.
बसस्थानकातील पोलीस चौकी सुरू करा
गडचिरोली : महामंडळाचे गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा सदर पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते.