गडचिरोली : शासकीय कार्यालयांमध्ये अपंग व्यक्तींना मुक्त संचार शक्य व्हावा या दृष्टीने रॅम्प असणे आवश्यक आहे. अशा प्रकारची व्यवस्था शाळा, महाविद्यालयांनी करावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अपंग कल्याण समितीची मासिक आढावा सभा गुरूवारी पार पडली. या सभेत आव्हाड बोलत होते. सभेत अपंग कर्मचारी व अधिकारी यांना सहायक साधने आणि तंत्रज्ञान उपकरणे पुरविण्याबाबत जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ च्या अनुषंगाने अपंग व्यक्तींना शासकीय कार्यालयात मुक्त संचार शक्य व्हावा याची काळजी घ्यावी, असे आव्हाड यावेळी म्हणाले. शाळेत शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून त्याला आधार क्रमांक जोडण्याच्या सूचना आहेत त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. अपंगांची पदे रिक्त राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना आव्हाड यांनी दिल्या. अपंग व्यक्तींना कामकाज करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून त्यांना तंत्रज्ञानाची मदत होत असते अशा स्वरुपाच्या तंत्रज्ञान सहायक उपकरणाची खरेदी विभागांनी करुन घ्यावी, असेही आव्हाड म्हणाले. या बैठकीला समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि.प.) आर.के. कोलते तसेच इतर कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
अपंगांना कार्यालयात सुविधा पुरवा- आव्हाड
By admin | Updated: November 7, 2015 01:33 IST