माओवाद्यांचा उद्रेक : साडेचार वर्षात जिल्ह्यात ५६ घटनागडचिरोली : हिंसक कारवायासोबतच माओवादी जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी जाळपोळीच्या घटना घडवून आणतात. २०११ पासून तर २०१५ च्या ३१ आॅगस्टपर्यंत साडेचार वर्षांच्या कालावधीत नक्षलवाद्यांनी जाळपोळीच्या ५६ घटना घडवून आणल्या. यामुळे १ कोटी ३८ लाख १३ हजार ९२५ रूपयांच्या शासकीय मालमत्तेचे व ५ कोटी ७७ लाख ९४ हजार ९०० रूपयांचे खासगी मालमत्तेचे असे एकूण ७ कोटी १६ लाख ८ हजार ८२५ रूपयांचे नुकसान झाले. शासन व प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी माओवादी संघटनेच्या वतीने शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहादरम्यान जिल्ह्याच्या अनेक भागात नक्षलवादी हिसंक कारवाया करतात. शिवाय ग्राम पंचायत इमारत, वन विभाग कार्यालयाच्या इमारती, बीएसएनएलचे टॉवर तसेच इतर शासकीय इमारतीची जाळपोळ करतात. तसेच निर्माणाधीन बांधकामावरील ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी व इतर साहित्यांची जाळपोळ करतात. या जाळपोळीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक होते. जाळपोळीच्या घटनांमुळे अतिदुर्गम भागात रस्ते व इतर विकास कामे करण्यासाठी कंत्राटदार धजावत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास कामे रखडून पडली आहेत. अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालय व धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्राम पंचायत कार्यालयाचे दस्तावेज व फर्निचर नक्षलवाद्यांनी ९ सप्टेंबर २०१५ रोजी बुधवारच्या मध्यरात्री जाळल्याची घटना घडली होती. यात साहित्य जळाल्याने वन विभाग व ग्रा. पं. चे नुकसान झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
नक्षली जाळपोळीत मालमत्ता जळून ७ कोटी १६ लाखांचे नुकसान
By admin | Updated: October 1, 2015 01:37 IST