चामाेर्शी : जिल्ह्यातील बाराही तालुक्यात जंगल आहे. तसेच जंगलाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात सरपणाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. महिलांच्या आरोग्याचा व धुरमुक्त स्वयंपाक हा विचार करून शासनाने प्रत्येक कुटुंबाला उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन दिले. मात्र दिवसेंदिवस गॅस भरण्यासाठी असलेले दर वाढत जात असल्याने गोरगरीब जनतेला गॅस भरणे परवडत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे सुरु झाले आहे. स्वयंपाक तयार करण्यासाठी लागणाऱ्या सरपणासाठी महिला पायपीट करीत असून यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शेतातील पिके निघाल्यावर शेतकरी व नागरिक पावसाळ्यात लागणाऱ्या सरपणाची तजवीज करीत असतात. यासाठी शेताच्या बांधावर असलेले झाडे तोडून वाळवत असतात मग पावसाळ्यात त्या सरपणाचा उपयोग केला जातो. त्यासाठी महिला सकाळी सरपण गोळा करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. त्या दुपारपर्यंत डोक्यावर मोळी घेऊन घरी परतताना दिसून येत आहेत. गॅसच्या किमती कमी होत्या तेव्हा बरेच कुटुंब गॅसवर स्वयंपाक करीत होते. मात्र दिवसेंदिवस गॅस भरण्यासाठी हातात चार पैसे नसल्याने बरेच कुटुंब गॅस सिलिंडर भरणे बंद केले आहेत. त्यामुळे पुन्हा सरपण गोळा करण्यासाठी महिलांना धडपड करावी लागत आहे. जंगलव्याप्त जिल्हा असूनही जिल्ह्यात सरपणाची गंभीर समस्या कायम असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
गोबरगॅसची झाली आठवण
पूर्वी ‘गाव तिथे गोबरगॅस ’ ही संकल्पना होती मात्र जनावरांच्या घटत्या संख्येमुळे गोबर गॅसचे अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही. शेतातील बहुतेक कामे टॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे जनावरे पाळणे आता कमी होऊ लागले आहे. जनावरांच्या शेणाचा गोबर गॅससाठी वापर करून त्याचा इंधन म्हणून वापर केला जात होता. मात्र जनावरांची संख्या रोडावली असल्याने गावागावात असलेल्या गोबर गॅस बंद पडलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे आता शेतकरी गोबर गॅसची आठवण करू लागले आहेत.
ग्रामीण भागात इंधन म्हणून गोवऱ्याचा आधार
ग्रामीण भागात सरपणाची समस्या कायम आहे. त्यासाठी शेतकरी कुटुंब आपल्याकडे असलेल्या जनावरांच्या शेणापासून गोवऱ्या थापण्याचे काम करीत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शेतकरी महिला उन्हाळ्यात शेतशिवारात गोवऱ्याच थापताना दिसून येत आहेत. पावसाळ्यात इंधन म्हणून गोवऱ्याचा माेठा आधार मिळत असतो यासाठी गावाबाहेरील शेतात वाळलेल्या गोवऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.
पैशाच्या लोभापायी शेतातील वृक्षावर कुऱ्हाड
शेतकरी शेताच्या बांधावर असलेल्या वृक्षाचे पालनपोषण करून मोठ्या कष्टाने वाढविले. मात्र पैशाचा लोभ वाढत गेल्याने शेतातील वृक्ष तोडून ती परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांना विकली जात आहेत. त्यामुळे शेतशिवारातील सावली आता हळूहळू नष्ट व्हायला लागली आहे. विशेषतः बाभूळ व सुबाभूळ झाडाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना यापोटी चार पैसे मिळत असले तरी मात्र पर्यावरणीय समस्या वाढत जाणार आहे. याबाबत पर्यावरण प्रेमी व वनविभाग मौन धारण केलेले दिसून येत आहे.