न्यायालयाचा निर्णय : दोन वर्ष, सात महिने कारवासासह पाच हजार रूपयांचा दंडगडचिरोली : एका सुतळी व प्लास्टिक बोरीमध्ये दुचाकीने अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी दोन वर्ष सात महिने सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.गोकुलराम मानसिंग चंद्रवंशी रा. डुंडेरा जि. राजनांदगाव (छत्तीसगड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहा आॅक्टोबर २०१३ रोजी गोकुलराम चंद्रवंशी हा कोरची परिसरात गांजाची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती कोरची पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पाळत ठेवून सापळा रचून त्याच्या प्लास्टिक बोरीची चौकशी केली असता, त्याच्या बोरीमध्ये १५ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी कलम २०, २२, मादक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारात परिणाम प्रकारे अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाअंती विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे फिर्यादी पोलीस उपनिरिक्षक सतीश वसंतराव उमरे व इतर साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. न्यायालयाने सरकारी पक्षात युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस भादंवि कलम २०, मादक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारात परिणाम करणारे अधिनियम १९८५ अन्वये दोषी ठरवून दोन वर्ष सात महिने सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास दोन महिने कारावास वाढणार आहे. सदर शिक्षा विशेष सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता निलकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी केला. खटल्यादरम्यान पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय जयेश खंदरकर यांनी काम पाहिले.
गांजा वाहतूक करणाऱ्यास कारावास
By admin | Updated: May 6, 2016 01:16 IST