सत्काराला उत्तर : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा नागरी सत्कारगडचिरोली : लोकमत महाराष्ट्रीय आॅफ दी इयर - २०१६ प्रशासकीय सेवा (विभागीय) पुरस्कार मला मिळाला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सीड्स संस्थेच्या वतीने माझा गौरव झाला. लोकमत व सीड्सतर्फे माझा झालेला हा गौरव वैयक्तिक नसून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. लोकमत महाराष्ट्रीय आॅफ दी इयर २०१६ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोसायटी फार सोशल इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट (सीड्स) व गडचिरोलीवासींच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा रविवारी विनर्स अकॅडमीच्या प्रांगणात नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार होते तर प्रमुख अतिथी म्हणून सीड्सचे सचिव सतीश चिचघरे उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, लोकमतने पुरस्कारासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर आॅनलाईन मतदान घेण्यात आले. यात मला एकूण १ लाख ५५ हजार मते मिळाली. विशेष म्हणजे मला या पुरस्कारासाठी गडचिरोली जिल्ह्यातून ४० हजार मते मिळाली. पुरस्कारासाठी जनतेनेच माझी निवड केली असे सांगून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे तसेच अडचणीवर मात करून ध्येयाप्रती सातत्य ठेवून यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश चिचघरे, संचालन प्रा. राकेश चडगुलवार यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
माझा वैयक्तिक नव्हे तर हा गडचिरोली जिल्ह्याचा गौरव
By admin | Updated: April 11, 2016 01:34 IST