एटापल्ली : लॉयड मेटल कंपनीच्या मार्फतीने सुरू असलेले उत्खनन व वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने माजी आ. दीपक आत्राम व जिल्हा परिषद कृषी सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास सात हजार नागरिक सहभागी झाले होते. लोह खनिजाचे उत्खनन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी ६ एप्रिल रोजी तहसील कार्यालय व ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने २२ मागण्यांचे निवेदन आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने देण्यात आले. १३ एप्रिल रोजी लॉयड मेटल कंपनीच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालय एटापल्ली येथे एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करण्यात आले. मात्र निवेदनातील एकही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाने २१ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक, आदिवासी विद्यार्थी संघाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. राजीव गांधी हायस्कूल येथून दुपारी १ वाजता मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले जाणार आहे. निवेदन देतेवेळी माजी आ. दीपक आत्राम, जिल्हा परिषद कृषी सभापती अजय कंकडालवार, जि. प. सदस्य कारू रापंजी उपस्थित होते. मोर्चामध्य ेगीता हिचामी, नंदू मट्टामी, मंगेश हलामी, शंकर दासरवार, रामदास कुंभरे, श्यामलता मडावी, सोहेगावच्या सरपंच उईके, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, रवी खोब्रागडे, सुरेश तलांडे, प्रज्वल नागुलवार, लक्ष्मण नवडी, रेश्मा सुरपाम, नरेंद्र कुमोटी, किरण लेकामी, केशव कुळयेटी, सुरेश पदा, रमेश वैरागडे, अविनाश सूरजागडे, गंगाधर मडावी, मधुकर पदा, वसंत भांडेकर, बबीता मडावी यांच्यासह या मोर्चात एटापल्ली तालुक्याच्या गावातून सात हजारांवर अधिक नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)उत्खननास शासनाचे पाठबळ- दीपक आत्रामसूरजागड येथील लोह खनिजाचे उत्खनन करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यास शासनच पाठबळ देत आहे. त्यामुळे मागील एक महिन्यापासून जिल्हाभरातील नागरिक आंदोलन करीत असतानाही कंपनी लोह खनिजाची खुलेआम वाहतूक करीत आहे. कंपनी व सरकारचा हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा माजी आ. दीपक आत्राम यांनी आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना दिला. या आहेत मागण्या४लॉयड मेटल कंपनीच्या मार्फतीने कक्ष क्र. १९७, १९८, १९९, २२८ येथे रस्त्याचे काम व लोह खनिजाचे उत्खनन सुरू आहे. हे काम तत्काळ बंद करावे, एटापल्ली तालुक्याच्या ठिकाणी जनसुनावणी घ्यावी, पुरसलगोंदी व नागुलवाडी ही गावे पेसा कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे उत्खननाचा अधिकार ग्रामसभांना देण्यात यावा, एटापल्ली तालुक्यातच लोह खनिजावर आधारित उद्योग उभारावा, एटापल्ली तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना कंपनीच्या वतीने प्रशिक्षण देऊन प्राधान्याने रोजगार द्यावा, संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत बाधित होणाऱ्या क्षेत्रातील गावांना शिक्षण, आरोग्य, पाणी, रोड, रस्ते या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावा या मागण्यांचा समावेश आहे.
लोह खनिजाचे उत्खनन व वाहतूक थांबवा
By admin | Updated: April 22, 2016 03:15 IST