गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सध्या राज्यभर सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातही एक महिन्यापूर्वी या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. तालुकास्तरावरील प्रक्रिया पार पडली. जिल्हा अध्यक्षपदासाठी दोन नावे पुढे आल्याने आता प्रदेशाध्यक्षांना या निवडीसंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. २३ एप्रिल रोजी मुंबर्ई येथे यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती पक्षाचे गडचिरोली जिल्हा निवडणूक निरीक्षक राजेंद्र वैद्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बाराही तालुक्यात क्रियाशील सभासदांची नोंदणी झाल्यानंतर तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली. जिल्हाध्यक्षाची निवड मात्र होणे बाकी राहिले आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी बबलू हकीम यांचे नाव पुढे केले आहे. तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश ताकसांडे यांचे नाव समोर करण्यात आले आहे. पक्षाच्या घटनेनुसार कार्यकारी अध्यक्षाची निवड करता येत नाही व तसे पदही अस्तित्वात नाही. मात्र गेल्या काही वर्षात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष तसेच काही जिल्ह्यात कार्यकारी अध्यक्षही नियुक्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदाचा निर्णय आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या समोर होणार आहे. राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना २३ एप्रिल रोजी मुंबई येथे बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आला आहे. आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुका असल्याने जिल्हा मुख्यालयातील व्यक्त अध्यक्ष असावा, असा मतप्रवाह अनेकांचा आहे. त्यामुळे गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे आता २३ तारखेला स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय प्रदेशाध्यक्षांच्या हाती
By admin | Updated: April 20, 2015 01:26 IST