रिक्त पदांवर नियुक्ती : संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी गडचिरोली : जिल्ह्यातील वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागात आपली शासकीय सेवा बजावतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांच्या पालनपोषण, संगोपनाची जबाबदारी नैसर्गिकरित्या वारसदाराकडे आली आहे. मात्र उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने पालनपोषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना एक विशेष बाब म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये गट क व ड संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के अनुकंपा तत्वावर भरण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अनुकंपा संघटना गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य बबन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गट ‘क’ आणि ‘ड’ मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबीयांना तत्काळ सहाय्य व्हावे व त्यांना मदत मिळावी याकरिता अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे शासनाचे धोरण आहे. १ मार्च २०१४ रोजी अनुकंपा नियुक्तीसाठी गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गामध्ये प्रतीवर्षी रिक्त पदांवर १० टक्के एवढी पदे भरण्याची मर्यादा करण्यात आली. या शासन निर्णयानुसार प्रतिवर्षी केवळ एक वा दोन पदे अनुकंपा तत्वावर भरण्यासाठी काढली जातात. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागातील अनुकंपाधारकांची संख्या २०१७ मध्ये ११७ आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात ७५ इतकी आहे. तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत ३० अनुकंपाधारक प्रतीक्षेत आहेत. यातील काही जणांची नियुक्ती झाली तरी नव्याने प्रकरणे समाविष्ट होतच असतात. यामुळे दिवसेंदिवस समाविष्ट होत असलेल्या प्रकरणांची संख्या वाढतच आहे. यामुळे ‘क’ व ‘ड’ संवर्गातील १०० टक्के जागा केवळ अनुकंपाधारकांमधूनच भरण्यात याव्यात, गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांकरिता पेसा कायद्याची अट शिथील करण्यात यावी, अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्या अनुकंपा धारकांची वय ४५ वर्षे पूर्ण होणार आहे, अशा अनुकंपा धारकांची वयोमयार्दा वाढवून ४८ वर्षे करण्यात यावी, आदी मागण्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. या मागण्यांना घेवूनराज्यभरातील अनुकंपाधारक येत्या ७ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजू ठाकरे, लक्ष्मी मेश्राम, शाकीर पठाण, प्रशांत चैधरी, आशिष कुमरे, आमिर उईके आदी उपस्थित होते.
अनुकंपाधारकांना प्राधान्य द्या
By admin | Updated: March 1, 2017 01:44 IST