मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे निवेदन : राज्य महिला आयोगाकडे तक्रारगडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयाचे प्रसुतीतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांच्या दुर्लक्षितपणामुळे अहेरी येथील शमीम सुलतान शेख या महिलेचे बाळ गर्भाशयातच दगावले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याच्या आरोग्य विभागाने समितीमार्फत विभागीय चौकशी नुकतीच केली. आता पुन्हा या प्रकरणाची तक्रार मुस्लीम वेल्फेअर सोसायटीने महाराष्ट्र महिला आयोग मुंबईच्या अध्यक्ष विजया राहटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे डॉ. प्रविण किलनाके यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष महमद मुस्तफा शेख, सचिव अकिल अहमद शेख यांनी सदर बाळ दगावल्याच्या प्रकरणाची राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली. सदर समितीत नागपूर येथील सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ. फूलचंद मेश्राम, डागा हॉस्पीटल नागपूरच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, डागा रूग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीता जयंत यांचा समावेश होता. या तिन्ही सदस्यांनी ७ जानेवारी रोजी रविवारला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी केली. मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात जाऊन तक्रारकर्ते व संबंधिताचे बयाण नोंदविले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह सामान्य रूग्णालयाच्या प्रसुती व बाल रूग्ण विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे बयाण नोंदवून घेतले होते. गर्भाशयात बाळ दगावल्याच्या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज या समितीच्या सदस्यांनी तपासले. प्रसुतीतज्ज्ञ डॉ. किलनाके यांच्या अनागोंदी कारभाराबाबत आजवर अनेक रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही काही लोकप्रतिनिधींनी थेट डॉ. किलनाके हे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून जिल्हा सामान्य रूग्णालयात पैशाची मागणी करतात, अशी तक्रार केली होती. मात्र आरोग्य विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांतर्फे डॉ. किलनाके यांना अभय मिळाल्याने त्यावेळी डॉ. किलनाके यांच्यावर कारवाई झाली नाही. डॉ. किलनाके यांच्या विरोधात कोणत्याही रूग्ण वा त्यांच्या नातेवाईकांची तक्रार असल्यास त्यांनी मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. किलनाके यांच्या विरोधात अनेक रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात तक्रारी सादर केल्या आहेत, अशी माहिती सोसायटीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आता पुन्हा राज्य महिला आयोगाकडे डॉ. किलनाके यांच्या विरोधात लेखी तक्रार मुस्लीम सोसायटीने केल्याने डॉ. किलनाके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)किलनाकेंच्या खासगी रूग्णालयाची तक्रारजिल्हा सामान्य रूग्णालयाचे प्रसुती तज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांचे मूल मार्गावर वात्सल्य सुश्रृषालय नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आहे. डॉ. किलनाके यांनी या खासगी दवाखान्याची वेळ दुपारी ३ ते रात्री ९ अशी फलकावर दाखविली आहे. सदर रूग्णालयाची व डॉ. किलनाके यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष महमद मुस्तफा शेख व सचिव अकिल अहमद शेख यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. डॉ. किलनाके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रवीण किलनाके यांच्या अडचणी आणखी वाढणार
By admin | Updated: January 16, 2017 00:50 IST