व्यथा सिरोंचावासीयांची : टॉवर लाईन टाकण्याची मागणीसिरोंचा : गोंडपिंपरी-आलापल्ली-सिरोंचा अशा १०० ते १५० किमी अंतरावरून असलेला वीज पुरवठा सध्या सिरोंचा भागासाठी कमालीचा डोकेदुखीचा झाला आहे. वारंवार वीज खंडीत होत असल्याने तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहे. सिरोंचा हा गडचिरोली जिल्ह्याचा सर्वात जुना तालुका. ब्रिटीश काळातही या भागाची स्वतंत्र ओळख होती. सध्या या तालुक्याला खंडीत वीज पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. गोंडपिंपरी, आलापल्ली येथून सिरोंचाचा वीज पुरवठा करण्यात येतो. सिरोंचा ते आलापल्ली हे १०० किमीचे अंतर आहे व हा संपूर्ण भाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगलाच्याच भागात वीज पुरवठ्याचे तारा व खांब आहेत. पाऊस व वारा आल्यास लगेच वीज पुरवठा खंडीत होतो. तो सुरू होण्यासाठी किती काळ लागेल हे ही निश्चितपणे सांगता येत नाही. अनेकदा एकएक दिवस या भागात वीज नसते. सकाळी वीज गेली तर रात्री उशीरापर्यंत ती येत नाही. तसेच अनेकदा वीज येणे व जाणे सुरू राहते. तसेच या वीज पुरवठ्याच्या तारा ४० ते ५० वर्ष जुन्या आहेत. त्याचाही काही परिणाम वीज पुरवठ्यावर होत असावा, असा नागरिकांचा अंदाज आहे. वीज पुरवठा खंडीत तसेच कमी जास्त दाबाचा राहत असल्याने घरगुती वीज उपकरणेही निकामी होत आहे. परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. आलापल्ली ते सिरोंचा ही टॉवर लाईन टाकण्यात यावी, अशी मागणी सिरोंचा येथील जनतेने केली आहे. या संदर्भात पालकमंत्री आर. आर. पाटील यांनीही काही महिन्यांपूर्वी आढावा बैठकीत याबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. परंतु अद्याप हे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे सिरोंचावासीयांची अडचण होत आहे.पावसाळ्याचे दिवस तोंडावर असलेल्याने रात्रीचा वीज पुरवठा बंद होणे ग्रामस्थांसाठी त्रासाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
१०० किमीवरून वीज पुरवठा त्रासाचा
By admin | Updated: July 14, 2014 02:12 IST