गडचिरोलीत सभा : नितीन गडकरींच्या उपस्थितीतगडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दोन दिवसांपूर्वी त्याग करून पक्ष सोडणारे ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व त्यांचे धाकटे बंधू गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोेरेड्डीवार यांनी आपल्या ५०० वर समर्थकांसह रविवारी गडचिरोली येथे भारतीय जनता पक्षाच्या निवडणुक प्रचार सभेत केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी गडकरी यांनी अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व भाजपचा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना अरविंद पोरेड्डीवार यांनी १९५२ मध्ये आपले वडील नामदेवराव पोरेड्डीवार आमदार होते. तेव्हापासून आपण काँग्रेस पक्षाचे काम करीत होतो. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कॉंग्रेस सरकारच्या काळात कमी झाले ते पूर्ववत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान चामोर्शीत दिले होते. मात्र ते पूर्ववत झाले नाही. त्यामुळे गैर आदिवासींच्या या प्रश्नावर आपण काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही पद लालसेतून आपण भारतीय जनता पक्षात आलेलो नाही. आपल्या पक्षात एक पाईक म्हणून शेवटपर्यंत काम करू, असे पोरेड्डीवार भावूक होऊन म्हणाले. या जाहीर सभेत पोरेड्डीवार बंधूंच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या शिक्षक सेल आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास बल्लमवार, आरमोरी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीहरी कोपुलवार, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. दुर्वेश भोयर, हैदरभाई पंजवाणी, कुरखेडाचे ज्येष्ठ काँग्रेस नेते खेमनाथ डोंगरवार, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंत मेश्राम, आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खिळसागर नाकाडे, आरमोरीचे उपसरपंच दीपक निंबेकर, माजी शिक्षणाधिकारी राजन हीरे, माधव गडीकर, लक्ष्मण रामटेके, मंगेश रणदिवे, काँगे्रसच्या विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, मंगेश रणदिवे, सुनिल पोरेड्डीवार, युवाशक्ती आघाडीचे आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, संगीता येरोजवार, राजेंद्र लाटेलवार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचे माजी स्वीय सहाय्यक महेंद्र करकाडे, नंदू नाकाडे, खुशाल नैताम, दीपक हेडाऊ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे गडकरी यांनी पक्षात स्वागत केले. याप्रसंगी छत्तीसगडचे गृहमंत्री सेवकराम पैकरा, काँकेरचे खासदार उसेंडी, गडचिरोली- चिमूरचे खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, रविंद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे आदी उपस्थित होते.
पोरेड्डीवार झाले भाजपवासी
By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST