एटापल्ली : जल, जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करण्याची पाळी आलेला आदिवासी माणूस निसर्गावर किती प्रेम करतो, याचे एक उत्तम उदाहरण एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा (दमकोंडी) येथे पाहायला मिळाले. सुरजागड भागातील तब्बल ७० गावांतील हजारो स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन गर्देेवाडा पहाडावर वनोपज आणि निसर्गदेवतेची पूजा करुन निसर्गाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.आदिवासी माणूस आदिम काळापासून निसर्गोपासक राहिला आहे. जंगलाचे रक्षण करुन त्याचे अस्तित्व कायम ठेवण्याचे काम तो आजपर्यंत करीत आला आहे. वृक्षवल्ली आणि पशुपक्ष्यांवर निस्सिम प्रेम करुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याची धडपड सतत राहिली आहे. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाच्या या रक्षणकर्त्यालाच जल, जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष सुरु असतानाच निसर्गावरील त्याचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करण्याची शपथ घेण्यासाठी निसर्गदेवतेला साकडे घालण्याची पारंपरिक प्रथाही त्याने कायम ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून १ एप्रिलला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड भागाच्या ७० गावांतील आदिवासी बांधव गर्देवाडाच्या पहाडावर एकत्र आले आणि त्यांनी निसर्गदेवतेची महापूजा केली. पेरमा भूमिया सैनू भुरा महा यांच्या हस्ते तेथे गडदेव आणि वनोपजाची महापूजा करण्यात आली. यावेळी सुरजागड भागाचे प्रमुख सैनू मासू गोटा, कनादेऊ गोटा, भारत जनआंदोलनाचे कार्यकर्ते चंद्रा कवडो यांच्यासह ७० गावांतील आदिवासी नागरिकांनी या महापूजेत भाग घेतला. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करुन सामुदायिक भोजन करण्यात आले. तत्पूर्वी वनाधिकार व पेसा कायद्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या दोनही कायद्याने आदिवासींना दिलेले हक्क व अधिकाराबाबत मंथन झाले. दरवर्षी १ एप्रिलला महापूजा करण्याचे ठरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
आदिवासींनी केली निसर्ग देवतेची पूजा
By admin | Updated: April 8, 2015 01:20 IST