हेडरी पोलीस ठाण्याचे उद्घाटन : गृहराज्यमंत्र्यांनी दिली ग्रामस्थांना ग्वाहीएटापल्ली : पोलीस तुम्हाला या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सदैव मदत करीत राहतील. त्यांच्या सहकार्यातून आपल्या गावाचा विकास तुम्ही करून घ्या. पोलिसांपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. सूरजागड लोहखनिज प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू झाले आहे. हा प्रकल्प झाल्यास तुमच्या गावातील आदिवासी तरूण या प्रकल्पात पहिले नोकरीला लागेल. तुमच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी केले.एटापल्ली तालुक्यातील संवेदनशील भाग असलेल्या हेडरी पोलीस ठाण्याचे गृहराज्यमंत्र्यांच्या मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, हेडरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक वैभव देशपांडे, पोलीस उपनिरिक्षक जयसिंग राजपूत, प्रविण सिरसाट, रघुवीर मुराडे, प्रफुल बेदरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आदिवासी बांधवांवर झालेल्या अत्याचारातून नक्षलवाद जन्माला आला. नक्षलवादी सर्वसामान्य लोकांना कोणतीही मदत करीत नाही. विकासापासून आजवर त्यांच्यामुळे आपण दूर राहिलो. नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे लोकांना मदत मिळत नाही. विकासापासून दूर ठेवण्याचे काम नक्षलवाद्यांनी आजवर केले. जे लोक या चळवळीत काम करीत आहे, त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल व्हावे व विकास करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
पोलीस तुमच्या मदतीला धावतील!
By admin | Updated: December 23, 2015 01:52 IST