सर्वांगीण विकास हेच ध्येय : जिल्हा पोलीस विभागाचा अनोखा उपक्रम सिराज पठाण - कुरखेडाजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन तसेच पोलीस मदत केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुगम भागातील किमान एक गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या समस्या सोडवून सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून धडकले आहे. यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला किमान एक दुर्गम गाव दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे.यापूर्वी गावदत्तक योजनेत राजकीय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचाच सहभाग असायचा. तर पोलीस विभाग हा कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून अवैध धंदे नियंत्रित करण्याची जबाबदारी पार पाडत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलिसांची प्रतिमा बदलविण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी पत्राद्वारे सर्व दुर्गम भागात कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्याचे फर्मान सोडले आहे. जनता व पोलिसातील दरी कमी व्हावी, पोलीस हे जनतेचे सेवक, मित्र आहेत, ही भावना वृद्धिंगत व्हावी, याकरिता जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या योजनेत जिल्हा पोलीस अधीक्षकासह सर्व उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनी गाव दत्तक घेऊन संबंधित गावांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. गडचिरोली या अतिमागास नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यात एटापल्ली, भामरागड, कुरखेडा, धानोरा, अहेरी, सिरोंचा आदी सहा तालुके अतिसंवेदनशील व दुर्गम आहेत. या भागात अद्यापही मुलभूत सोयीसुविधा नाहीत. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या नाही. यामुळे नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस विभागाला थोडीशी अडचण जात आहे. गाव दत्तक योजनेची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून दत्तक घेण्यासाठी निवडलेल्या गावाचे नाव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात येत आहे. नक्षलवाद निर्मूलनासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
पोलीस अधिकारी घेणार गाव दत्तक
By admin | Updated: July 8, 2014 23:28 IST