कुरखेडा : कुरखेडावरून पुराडाकडे जात असलेल्या दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीवरील पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची घटना कुरखेडा-कोरची मार्गावर जांभूळखेडापासून दोन किमी अंतरावर गुरूवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. सुरेंद्र गणपत गांडलेवार (४५) असे मृतक पोलीस हवालदाराचे नाव आहेत. पोलीस हवालदार सुरेंद्र गांडलेवार हे कामानिमित्त आपल्या एमएच ३४ टी २८८ या दुचाकीने कुरखेडावरून पुराकडे जात होते. जांभुळखेडा गावासमोर रस्त्यावर खड्डे बुजविण्याकरिता ठेवण्यात आलेल्या मुरूमाच्या ढिगाऱ्यावर त्यांचे दुचाकी वाहन आदळत अनियंत्रित झाले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते घटनास्थळीच बेशुध्द पडले. अपघाताची माहिती मिळताच पुराडाचे पोलीस उपनिरीक्षक पंकज महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून खासगी वाहनाद्वारे जखमी गांडलेवार यांना कुरखेडाच्या उपजिल्हा रूगणालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोयाम यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात पोलीस हवालदार ठार
By admin | Updated: June 27, 2015 01:56 IST