प्राप्त माहितीनुसार, आष्टी पोलीस स्टेशनअंतर्गत चंद्रपूर मार्गावर पोलीस पथक उपनिरीक्षक जंगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक वैरागडे हे तीन शिपायांसह नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, या पथकातील पोलीस नायक गजानन ठाकूर यांनी चंद्रपूरकडून येणाऱ्या मालवाहू आयशर या मिनीट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते वाहन न थांबता सरळ ठाकूर यांना धडक दिली. या धडकेमध्ये पोलीस शिपाई ठाकूर गंभीर जखमी झाले. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचे कळते. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, प्रकृती जास्त बिघडल्याने चंद्रपूरवरून नागपूर येथे पाठविण्यात आले.
धडक मारणारे वाहन (क्र.टीएस ०५, युडी २७५७) पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहन गाडीचा क्लिनर म्हणून काम करणारा अल्पवयीन युवक चालवत होता. मुख्य चालक शिवा हरिबाबू मल्लाडी (रा. अस्वराव पेठा, जिल्हा बद्री (तेलंगणा) याला अटक करण्यात आली. या आरोपीवर भादंवि कलम ३०८, ३३३, ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे करीत आहे.