५ मे रोजी पीएमटी परीक्षा : जिल्ह्यातील १३० आदिवासी विद्यार्थी प्रतीक्षेत गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, भामरागड व अहेरी प्रकल्पांतर्गत आदिवासी प्रवर्गातील बारावी (विज्ञान) उत्तीर्ण तसेच नुकत्याच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेचे प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येते. मात्र या प्रशिक्षणासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने तिन्ही प्रकल्प कार्यालयाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षणाचे आदेश देण्यात आले नाही. परिणामी जिल्ह्यातील १३० आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. गडचिरोली प्रकल्पांतर्गत यंदा १०० तर भामरागड व अहेरी प्रकल्पांतर्गत प्रत्येकी १५ अशा एकूण १३० विद्यार्थ्यांना पीएमटी पीईटी व परीक्षेचे पूर्वप्रशिक्षण द्यावयाचे आहे. यासाठी प्रकल्प कार्यालयाने जिल्ह्यातील चार स्वयंसेवी संस्थांची निवड केली. सदर प्रशिक्षण मार्चपासून सुरू होणे अपेक्षित होते. सदर प्रशिक्षण ४५ दिवसांच्या कालावधीचे आहे. ५ मे २०१६ रोजी पीएमटी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला आता ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र निधीअभावी प्रशिक्षण थंडबस्त्यात असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांसमोर प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अप्पर आयुक्त व प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पीएमटी व पीईटी परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्याची योजना आहे. मात्र या योजनेसाठी प्रकल्प कार्यालयाला निधी उपलब्ध झाला नाही. तसेच अप्पर आयुक्तांकडून प्रशिक्षण सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश मिळाले नाहीत. ३१ मार्चपर्यंत प्रकल्प कार्यालयाला निधी प्राप्त झाल्यास सदर प्रशिक्षण सुरू करण्याबाबत संबंधित संस्थांना आदेश देण्यात येईल. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रकल्प कार्यालयाच्या वतीने निधीची मागणी करण्यात आली आहे. - कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली
निधीअभावी पीएमटी, पीईटी प्रशिक्षण थंडबस्त्यात
By admin | Updated: March 26, 2016 01:23 IST