अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : शहराजवळची शेकडो एकर जागा आहे. एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. काही भूखंडांवर वर्षभराचा कालावधी उलटूनही उद्योग स्थापन केले नाही.
राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य
अहेरी : स्थानिक नगर पंचायत स्वच्छतेबाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी ररस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगर पंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली. मात्र अद्यापही समस्या सुटल्या नाहीत.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यामुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष हाेत आहे.
तंमुसला प्रशिक्षण देण्याची मागणी
रांगी : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे साेडविण्यास मदत हाेईल.
मोकाट जनावरांचा हैदोस
गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात. माेकाट जनावरांचा नगर पालिका प्रशासनाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी आहे.
पार्किंगची समस्या भारी
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय त्याचा व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी आहे.
खुटगावात निवारा बांधा
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याचे अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
आरमोरी : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी सुरक्षित करण्याची गरज आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात. येथे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे राेगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने लक्ष घालून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.
उद्याेग उभारण्याची मागणी
भामरागड : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात उद्याेगधंदे नसल्याने युवकांना बाहेरगावी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बेराेजागार युवक बाहेर स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे उद्याेग उभारावेत, अशी मागणी आहे.