गडचिरोली : पावसाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत लाखो झाडे लावण्यात आली. मात्र सदर कामाचा निधी बहुतांश ग्रामपंचायतींना व मजुरांना प्राप्त झाला नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन व या कामावर काम करणारे मजूर अडचणीत आले आहेत. मागील दोन वर्षांपासून राज्यात शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवड करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी वृक्ष खरेदी करून वृक्षांची लागवड केली. वृक्ष लागवडीसाठी खड्डा खोदण्यापासून तर सदर वृक्षाला पाणी देणे वृक्षासभोवताल कठडे बांधणे. यासाठी बराच पैसा खर्च करावा लागला आहे. सदर काम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या जाते. रोजगार हमी योजनेचा संपूर्ण पैसा संबंधीत मजुरांच्या खात्यामध्ये जमा होता. वृक्ष लागवडीसाठी जेवढे मजूर कामावर लावण्यात आले. तेवढ्यांचे मस्टर सर्वप्रथम पंचायत समितीला सादर केले जाते. त्यानंतर सदर प्रस्ताव जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले जातात. वृक्षारोपणाचे काम करून दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अजुनही बहुतांश मजुरांच्या खात्यामध्ये मजुरीची रक्कम जमा झाली नाही. शासकीय काम असल्याने मजुरी बुडणार नाही, याची शाश्वती मजुरांना असली तरी मजुरी मिळण्याबाबत अक्षम्य विलंब होत आहे. काही मजूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये जाऊन याबाबत विचारणा करीत आहेत. तर काही मजूर ग्रामपंचायतीच्या सचिवानेच मस्टर सादर केले नसावे, असा थेट आरोप करीत आहेत. त्यामुळे सरपंचासह ग्रामपंचायतचे सचिवसुध्दा त्रस्त झाले आहेत. मजुरांबरोबरच कुशल काम करणारे वेळोवेळी विचारणा करीत आहेत. कुशल कामाचा पैसा ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा होतो. त्यामुळे कुशल काम करणारेही सचिव व सरपंचांना त्रस्त करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)
वृक्षारोपणाचा निधी रखडला
By admin | Updated: September 29, 2014 23:05 IST