रत्नाकर बोमिडवार - चामोर्शीविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच तापला असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राची मदार चामोर्शी तालुक्यावरच आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या धुरीणांचे व उमेदवाराचे तालुक्यातील राजकीय घडामोडीकडे बारीक लक्ष राहते. भाजप, राकाँ, शिवसेना, काँग्रेस उमेदवारांनी प्रचारज्वर तापविला आहे, असे असतांना गैरआदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या पेसा कायद्याविरोधात वातावरण तापल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६८ टक्के गैरआदिवासी जनता असतांना पेसा कायदा लागू करून गैरआदिवासी जनतेचे हक्क हिरावून घेतल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील मतदार चवताळून उठले असून सर्वत्र पेसाविरोधी वातावरण तयार झाले आहे. गावागावात गैरआदिवासी तरूणांचे जत्थेचे जत्थे फिरून घरोघरी मतदानात नोटाचा वापर करा किंवा बहिष्कार टाका, असे आवाहन करीत आहे. कुनघाडा रै., अनखोडा, आष्टी, मोहुर्ली, फोकुर्डी, तळोधी अशा अनेक गावात सर्व उमेदवारांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे गावाच्या सीमेवरूनच परतून जावे लागत आहे. शासनाने सर्व योजनांचे लाभ पूर्ण अनुदानावर आदिवासींनाच का दिले जातात? गैरआदिवासींना का नाही? आदिवासींना बहुतेक योजनांच्या सवलतीचा लाभ दिला जात आहे. परंतु गैरआदिवासींवर अन्याय होणार नाही, याची काळजी का घेतली जात नाही, लोकप्रतिनिधीही गैरआदिवासींच्या भल्याचा विचार का करीत नाही, सरकारी व निमसरकारी नोकरीमध्ये वर्ग ‘क’ व ‘ड’ ची पदे पेसा अधिसूचनेंतर्गत आदिवासींसाठीच राखीव करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य असलेल्या गैरआदिवासींवर अन्याय होणार आहे. शासनाचा निर्णय गैरआदिवासींवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे जिल्ह्यात गैरआदिवासी युवकांनी मोठी चळवळ उभारली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्यासाठी गैरआदिवासी सरसावले आहेत. चामोर्शीसारख्या शहरी भागात देखील अनेक राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास मज्जाव केला जात आहे. गोंड मोहल्ला, मार्र्कं ड मोहल्ला, गव्हार मोहल्ला, केवट मोहल्ल्यातील नागरिक पेसाविरोधात पेटून उटला असून त्यांनी इतरही वॉर्डात पेसाविरोधीचे वातावरण पसरविले जात आहे. इतर मागासवर्गीय, अनुसूचित जातीच्या नागरिकांसोबत इतरही जातीचे सुशिक्षित बेरोजगार पेसा विरोधी वातावरण निर्माण करण्यास उभे ठाकले आहेत. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा-तळोधी, येनापूर, चामोर्शी- फराडा, भेंडाळा-दोटकुली, विक्रमपूर-विसापूर, आष्टी-इल्लूर, बोरी-सोनापूर, कोनसरी- किष्टापूर, घोट-सुभाषग्राम, रेगडी-चापलवाडा, मक्केपल्ली आदी जि. प.क्षेत्रात पेसाविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. चामोर्शी तालुक्यात उमेदवारांच्या प्रचाराचा झंजावात सुरू असला तरी आघाडी मात्र पेसाने घेतली आहे. बहिष्कार उठविण्यात कोणता उमेदवार यशस्वी होतो, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. चामोर्शी तालुक्यात या मतदार संघातील सर्वाधिक मतदार असून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही आहेत. मात्र सध्या पेसाविरोधी वातावरण पाहू जाता, कार्यकर्तेही गावकऱ्यांच्यापुढे काहीही बोलण्यास धजावत आहेत.
पेसाविरोधी वातावरण झाले गरम
By admin | Updated: October 8, 2014 23:27 IST