चार महिने उलटले : लाभार्थ्यांच्या कार्यालयात हेलपाटादेसाईगंज : कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यास सदर कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. याकरिता स्थानिक पातळीवर तलाठी कार्यालयातून कार्यवाही होणे गरजेचे असते. त्याशिवाय प्रकरणे पुढे रेटली जात नाही. परंतु याउलट स्थिती असल्याचे देसाईगंज तलाठी कार्यालयात दिसून आले आहे. चार महिन्यापासून लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. परिणामी लाभार्थी कार्यालयाच्या हेलपाटा मारत आहेत.देसाईगंज येथील किदवाई वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील कमावत्या व्यक्तीचे निधन झाले. परिणामी त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असल्याने तलाठी कार्यालयात सदर प्रकरण १४ जानेवारी २०१६ ला दाखल करण्यात आले. तलाठ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित कुटुंबातील व्यक्ती दोनदा तलाठी कार्यालयात कार्यवाहीसाठी हजरही झाली. परंतु प्रकरण पुढे रेटण्यात आले नाही. तलाठी व कोतवालांकडून आज या, उद्या या अशी बोळवण करण्यात आली. सध्या प्रकरण दाखल केल्याचा घटनेला चार महिने उलटले आहेत. परंतु संबंधित लाभार्थ्याला अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. प्रकरण तलाठी कार्यालयातच धूळखात ठेवण्यात आले आहे. या कार्यालयात इतरही प्रकरणे अशाच प्रकारे धूळखात ठेवण्यात आली, अशी माहिती आहे. तलाठी कार्यालयास अशा प्रकारे प्रकरणे प्रलंबित ठेवत असतील तर मदत कशी मिळणार, असा सवाल करीत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राकाँ अल्पसंख्य आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अ. लतीफ शेख यांनी केली आहे.
देसाईगंज तलाठी कार्यालयात अर्थ सहाय्य योजनेची प्रकरणे प्रलंबित
By admin | Updated: April 25, 2016 01:19 IST