मोहटोला (किन्हाळा) : मागील दोन वर्षांपासून रीडिंग न करताच वीज देयके पाठविली जात आहेत. परिणामी काही वीज पंप बंद असतानाही त्या शेतकऱ्यांना वीज बिल भरून द्यावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी प्रत्येक मिटरची रीडिंग करून त्यानुसार वीज बिल पाठविला जात होता. त्यामुळे जो शेतकरी जेवढी वीज वापरेल, तेवढेच वीज बिल त्याला भरावे लागत होते. मात्र रीडिंग न करताच एक निश्चित वीज बिल पाठविले जात असल्याने जे शेतकरी जास्त वापर करीत आहेत, अशा शेतकऱ्यांना फायदा असला तरी जे शेतकरी कमी वापर करीत आहेत. त्याचा मात्र तोटा होत आहे. अरतोंडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकदाही वीज कर्मचारी गेला नाही. मात्र येथील शेतकऱ्यांना अवास्तव बिल पाठविणे सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. उन्हाळ्यामध्ये बहुतांश शेतकरी कोणतेच उत्पादन शेतात घेत नाही व पावसाळ्यातही वीज पंपाचा वापर करीत नाही. त्यामुळे जवळपास चार महिन्यांचे बिल त्यांना नको असतानाही, वीज कंपनी बिल पाठवित आहे. परिणामी या बिलांचा भरणा शेतकऱ्यांना करावा लागत आहे. (वार्ताहर)
कृषी पंपाची रीडिंग न करताच देयके
By admin | Updated: May 8, 2015 01:37 IST