पालकमंत्र्यांना निवेदन : आसरअल्ली, गुमलकोंडाच्या नागरिकांची मागणीआसरअल्ली : वाढत्या महागाईच्या काळात अत्यल्प मजुरीत आसरअल्ली भागातील मजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीचा विचार करून यंदा तेंदूपत्त्याला प्रती शेकडा ५०० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी आसरअल्ली, गुमलकोंडा येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली भागात यंदा प्रचंड दुष्काळपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या भागातील मजूर कामासाठी तेलंगणा राज्यात पलायन करीत आहेत. त्यामुळे आसरअल्ली भागातील अनेक गाव नागरिकांअभावी ओसाड झाले आहेत. या भागात उपासमारीची पाळी अनेकांवर आली आहे. या सर्व बाबीचा विचार करून तेंदूपत्त्याला प्रती शेकडा ५०० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या मागणीच्या निवेदनाची प्रत खासदार अशोक नेते यांनासुद्धा पाठविण्यात आली आहे. निवेदन देताना नाविसंचे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष गजानन कलाक्षपवार, श्रीकांत सुगरवार, लांचानी शंकर, श्रीनिवास नागभूषणम, श्रीनिवास गोतुरी आदी उपस्थित होते. दरम्यान गजानन कलाक्षपवार यांनी पालकमंत्री आत्राम यांना आसरअल्ली भागातील मजुराचे तेलंगणा पलायन होऊ नये यासाठी याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली. (वार्ताहर)
तेंदूपत्त्याला प्रती शेकडा ५०० रूपये भाव द्या
By admin | Updated: April 28, 2016 01:06 IST