सिमेंट काँक्रीटचा दिला थर : सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त; खड्ड्यांमुळे वाहनधारक झाले होते त्रस्त गडचिरोली : पहिल्याच संततधार पावसाने शहरातील चंद्रपूर, चामोर्शी डांबरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले. तसेच बऱ्याच ठिकाणी डांबरीकरण उखडले. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करूनही मार्गावरील संपूर्ण खड्डे बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील चंद्रपूर मार्गालगत वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन शुक्रवारी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविले. ‘गडचिरोली शहर सापडले खड्ड्यात’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून चामोर्शी, चंद्रपूर मार्गावरील रस्ता दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने चंद्रपूर मार्गावर पटेल सायकल स्टोअर्सच्या मागील परिसरातील खड्डे बुजविले. मात्र चंद्रपूर मार्गावरील पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावरील खड्डे कायम होते. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले. त्यानंतर या मार्गावरील दुकानदारांनी व रहिवासी नागरिकांनी सदर रस्ता दुरूस्ती संदर्भात महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. प्राधिकरणाने सदर जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ढकलली. त्यानंतर नागरिकांनी साबांविकडे रस्ता दुरूस्ती संदर्भात पाठपुरावा केला. मात्र प्रत्यक्षात विभागाच्या वतीने रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविले. यासाठी येथील नागरिक बबलू बरच्छा, बाळू गावेर्धन, इमरान अल्ली, डोमदेव गेडाम, नंदकिशोर कुंभारे, निखील वाकडे, क्रिष्णा मानकर, अशोक भोयर, राहूल जाधव, प्रफुल आवारी, राजू टेकाम यांनी सहकार्य केले. लोकवगर्णीतून सिमेंट खरेदी चंद्रपूर मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी सिमेंटची गरज होती. त्यामुळे येथील दुकानदार व नागरिकांनी वर्गणी काढून सिमेंटची खरेदी केली. नागरिकांच्या सहकार्यातून सिमेंट काँक्रीट तयार करून पेट्रोलपंपसमोरील रस्त्यावरील पाच ते सहा ठिकाणचे मोठे खड्डे बुजविले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम नागरिकांना करावे लागत असल्याची प्रतिक्रिया ये-जा करणाऱ्या अनेक लोकांनी कामादरम्यान बोलून दाखविली. चंद्रपूर, धानोरा, चामोर्शी, आरमोरी या चारही मुख्य डांबरी मार्गाची पक्की दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
श्रमदानातून नागरिकांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे
By admin | Updated: July 23, 2016 01:56 IST