आरमोरी : पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे ग्रामीण भागात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. चिठ्ठी काढण्यासाठी एकच कर्मचारी असल्याने रुग्णांची मोठी रांग लागली होती. आरमोरी येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात देसाईगंज, कुरखेडा व आरमोरी या तीन तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच गर्दी राहते. पावसाळ्यामुळे ग्रामीण भागात डासांची पैदास वाढून मलेरियासह अनेक साथीचे रोग पसरले आहेत. त्यामुळे रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहेत. ओपीडीतील रुग्णांना सर्वप्रथम चिठ्ठी काढावी लागते. त्यानंतरच त्यांच्यावर उपचार केले जातात. चिठ्ठी काढण्यासाठी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र दोन खिडक्या आहेत. मात्र सोमवारी यातील एक कर्मचारी अनुपस्थितीत असल्याने एकाच खिडकीतून चिठ्ठी काढावी लागत होती. त्यामुळे या कक्षाजवळ सुद्धा महिला व पुरूष रुग्णांची गर्दी जमली होती. ग्रामीण भागातील नाल्यांचा उपसा केला जात नाही. त्याचबरोबर फवारणीसुद्धा केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचा अनुभव आहे. (शहर प्रतिनिधी)
आरमोरी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा
By admin | Updated: July 27, 2016 01:48 IST